नशा

*******
लेखक सोमनाथ कोळेकर
नशा *******
हो पितो मी रोज दारू.. पण ती उतरली की कळतं वेदनेची किंमत १००० रुपयांपेक्षा नक्कीच जास्त आहे.. रथाचा सारथी होणं ते किती जिकिरीचं.. एक चाक अवेळी निखळ की.. वेळेच्या अश्वाना समजतच नाही.. ती आपली धावत राहतात.. कर्तव्यपूर्ती साठी.. रथ मात्र फिरत राहतो एकाच जागी.. वेदनेची गोलाकार वर्तुळ रेखत.. १५ वर्ष झाली तिला जाऊन.. तिची जागा घेणाऱ्या बऱ्याच सापडल्या असत्या.. पण तीन चार वर्षाचा तो लोभसवाना गोळा.. हुबेहुन तिच्यासारख्या दिसणारा.. भावनेला काटेरी कुंपण घालत गेला.. तिच्यासाठी जे जे करायचं ते सगळं त्याच्यासाठी करत गेलो.. तिने वडा भोवती मारलेल्या फेऱ्या सात जन्मा साठी होत्या.. त्या दोऱ्याच्या गाठी पहिल्याच जन्मात ढिल्या होतील तरी कश्या.. मोडक्या रथाची ती घरघर पिंजऱ्यात कोंडून ठेवली छातीच्या.. ओठाच्या दरवाजातून ती बाहेर डोकावतील इतकी सैल झालीच नाही कधी.. तुझी आठवण येत नाही असं काही नाही.. ती क्षणा क्षणाला येते.. मग मी तू माघारी सोडलेल्या जिवंत जीवकडं पाहून निभावून नेतो सारं.. असा एक अंतिम क्षण येतोच दिवसात.. की असह्य होत हे सारं.. मग हा तांबूस खंबा आपलंसं करतो मला.. तो असह्य क्षण निभावून नेतो तो.. धुंदीत असताना जाणीव होत राहते.. तुझ्या आठवणींची, तुझ्या प्रेमाची, तुझ्या सहवासाची खरच नशा नाही त्यात.. हो पितो मी रोज दारू.. पण ती उतरली की कळतं वेदनेची किंमत १००० रुपयांपेक्षा नक्कीच जास्त आहे..

Comments